वॉरन बफेच्या यशाचे ५ मंत्र | WARREN BUFFET – 5 SUCCESS MANTRA 

WARREN BUFFET - 5 SUCCESS MANTRA

‘गुंतवणूक म्हणजे जुगार नसून, नीट अभ्यास करून शांतपणे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या माणसाला शेअर बाजारात यश मिळतंच’. असा आत्मविश्वास वॉरन बफेने दिला आहे. शेअर बाजार आणि गुंतवणूक यांच्याविषयी गैरसमजच जास्त पसरले आहेत. यामुळे आपण आपलंच किती नुकसान करून घेतो याची कोट्यवधी लोकांना कल्पना नसावी, हे मोठं दुर्दैव आहे.

संदर्भ – वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र / WARREN BUFFETCHYA YASHACHE 50 MANTRA (Marathi Edition) by ATUL KAHATE | MEHTA PUBLISHING HOUSE

याखेरीज भारतीय गुंतवणूकदार नियोजनबद्ध प्रकारे शेअर बाजारात गुंतवणूक करत नसल्यामुळे भारतामधल्या कंपन्यांना भांडवलाची कमतरता जाणवते आणि यामुळे वारंवार देशाला परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर अवलंबून राहावं लागतं, हे याहून मोठं आणि देशपातळीवरचं दुर्दैव आहे.

शेअर बाजाराविषयीची ही नकारात्मक मानसिकता काही अंशी मोडून काढण्यासाठी तरी अशा लेखांचा (ब्लॉग चा ) उपयोग होईल आणि कदाचित काही वाचक तरी शेअर बाजारामधल्या गुंतवणुकीमुळे आपलं आयुष्य चांगल्या अर्थानं पार बदलू शकतं याची जाणीव करून घेतील, अशी आशा वाटते!

मंत्र १ : “गुंतवणूक ही नेहमी आयुष्यभरासाठीचीच करा.

‘गुंतवणूकदार’ आणि ‘नफेखोर’ यांच्यामधला फरक बहुतेक जणांच्या लक्षात येत नाही. ज्या माणसाला शेअर बाजारातून आयुष्यभरासाठीच्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीमधून आपलं भलं करून घ्यायचं असतं, त्याला ‘गुंतवणूकदार’ म्हणतात; तर ज्या माणसाला शेअर बाजाराच्या चढउतारांमधून आपला फायदा करून घ्यायचा असतो, त्याला ‘नफेखोर’ असं म्हणतात. 

दुर्दैवानं आपण ‘गुंतवणूकदार’ बनणं गरजेचं असल्याचं लक्षात न घेता, बहुतेक लोक ‘नफेखोर’ बनतात आणि आपलं नुकसान करून घेतात.

म्हणजेच दररोज शेअर्सच्या किमती वर-खाली होत असताना बघणं आणि त्यानुसार खरेदी-विक्रीचे निर्णय घेणं, कुणीही अमुक-अमुक शेअर्सची खरेदी किंवा विक्री करण्याचा सल्ला देताच त्यानुसार वागणं, शेअर बाजार थोडा वर जाताच आपल्याकडचे शेअर्स विकून टाकणं किंवा तो बुडाल्यावरही तेच करणं, ही सगळी ‘नफेखोर’ माणसाची लक्षणं आहेत. ‘

गुंतवणूकदार’ माणसानं काय केलं पाहिजे? – त्यानं मुळात गुंतवणूक करण्यापूर्वी खूप वेळ आपल्या निर्णयाला दिला पाहिजे. घाई गडबडीनं गुंतवणूक करण्याचा आततायी निर्णय त्यानं घेता कामा नये. आपल्या हातून गुंतवणुकीची उत्कृष्ट संधी निघून चालली आहे असं त्याला वाटलं तरी त्यानं शांत राहिलं पाहिजे. खूप विचार करून, आपल्या गुंतवणुकीमधल्या संभाव्य नुकसानीचा विचार करून त्यानं शक्य तितकी योग्य वेळ साधून गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणुकीसाठी ही अचूक वेळ आहे का याचा थोडा विचार त्यानं करावा.

प्रत्येक गुंतवणूकदाराच्या हातून अधूनमधून चुका घडत असतात. अगदी वॉरन बफेसुद्धा अशा चुकांना अपवाद ठरू शकत नाही. साहजिकच सगळी काळजी घेऊनसुद्धा आपलं कधीकधी नुकसान होणार, अशी मानसिकता गुंतवणूकदारानं बाळगली पाहिजे.

जर आपण खूप विचार करून केलेली गुंतवणूकच मुळात चुकीची होती असं खात्रीलायकरीत्या लक्षात आलं, तर मात्र गुंतवणूकदारानं त्याविषयी फार हळहळ करत बसणं योग्य नसतं. अशा वेळी त्यानं आपली चूक स्वीकारून या गुंतवणुकीतून मोकळं होणं व्यवहार्य ठरतं. 

सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या दृष्टीनं यामधल्या अनेक गोष्टी अशक्यप्राय किंवा धोकादायक ठरू शकतात. म्हणूनच ज्यांना एका मर्यादेपलीकडे धोका पत्करायचा नसेल आणि नफा थोडा कमी झाला तरी चालेल; पण नुकसानही मर्यादितच होईल असा आपला दृष्टिकोन ठेवायचा असेल, त्यांनी सरळ दीर्घ काळ उत्कृष्ट कामगिरी करत असलेल्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये पैसे गुंतवून यांना मी किमान दहा वर्षं हात लावणार नाही असं स्वतःला सांगितलं पाहिजे

अर्थातच शक्य असेल तर याच योजनेमध्ये नव्यानं आणखी पैसे गुंतवत राहिलं पाहिजे. ‘दीर्घ मुदतीसाठी’ म्हणजे नक्की ‘किती काळासाठी?’ असा प्रश्न काही जण विचारतात. या प्रश्नाला वॉरन बफेचं उत्तर ‘कायमसाठी’ असं आहे!  म्हणजेच एकदा गुंतवणूक केली की ती योग्यच असणार असं तो म्हणतो आणि म्हणूनच पैशांची गरज असल्याशिवाय ही गुंतवणूक काढूच नये, असं त्याला सांगायचं आहे. अर्थात प्रत्येक माणसानं आपल्या परिस्थितीनुसार आणि गरजांनुसार ‘दीर्घ मुदत’ या संकल्पनेचा अर्थ लावला पाहिजे.

मंत्र २ : “पहिला नियम – कधीच नुकसान होऊ देऊ नका. दुसरा नियम – पहिला नियम कधीच विसरू नका”.

वॉरन बफे हा खूप यशस्वी गुंतवणूकदार समजला जातो, यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे खूप पैसे कमावण्याबरोबरच पैसे न गमावण्याविषयीसुद्धा तो अतिशय जागरूक असतो. त्याच्या या स्वभावापोटीच त्यानं हा मजेशीर वाटणारा नियम तयार केला आहे. खरं म्हणजे हा एकच नियम आहे; पण त्याला मजेशीर रूप देण्यासाठी त्यानं उगीचच त्याचे दोन भाग पाडले आहेत. या नियमाचा अर्थ वरवर सोपा वाटत असला, तरी यशस्वी गुंतवणूकदारानं त्यातला मथितार्थ नीटपणे समजून घेतला पाहिजे. 

चक्रवाढव्याजाची जादू म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे, असं खुद्द अल्बर्ट आइनस्टाईन म्हणाला होता याची इथं आपल्याला आठवण ठेवायला पाहिजे. 

उदाहरणार्थ, समजा एखाद्या गुंतवणूकदारानं १५टक्के वार्षिक दरानं वाढ होत असलेल्या पर्यायामध्ये १० हजार रुपये गुंतवले आणि ही गुंतवणूक २० वर्षं कायम ठेवली, तर मूळच्या १० हजार रुपयांचे तब्बल १ लाख ६३ हजार रुपये होतील! 

आणखी पाच वर्षं ही गुंतवणूक तशीच ठेवली, तर त्याचे ३ लाख २९ हजार रुपये होतील! 

म्हणजेच आपलं नुकसान करून घ्यायचं नसेल तर खूप विचार करून आणि काळजी घेऊन गुंतवणूकदारानं निश्चयी वृत्तीनं योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे आणि ती गुंतवणूक शक्य तितक्या दीर्घ मुदतीसाठी कायम ठेवली पाहिजे. 

नुकसान फक्त गुंतवणुकीमधल्या चुकांमुळे होतं असं अजिबात नाही. यामागे गुंतवणूकदाराचा स्वभाव बऱ्याच अंशी कारणीभूत ठरतो. 

चुकीच्या वेळी गुंतवणूक करणं किंवा चुकीच्या वेळी ती काढून घेणं, हे तर सगळ्यांच्या बाबतीत घडतं. शेअर बाजार खाली जायला लागला, की सगळ्यांची पळापळ सुरू होते आणि तो वर जायला लागल्यानंतर सगळ्यांना हाव सुटते. यामुळे नको तेव्हा खरेदी-विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदार करतात. याखेरीज सतत शेअर्सच्या खरेदी-विक्रीमुळे गुंतवणूकदाराला विनाकारण कर आणि गुंतवणुकीशी संबंधित असलेले खर्च सोसावे लागतात. या सगळ्यातून त्याचं सातत्यानं नुकसान तरी होत राहतं किंवा त्याला शक्य असूनसुद्धा कमी फायदा तरी होतो. 

कुणी म्हणेल, आपलं नुकसान होता कामा नये हे प्रत्येक माणसालाच कळतं; पण ते आचरणात कसं आणायचं, हा मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर सोपं नसलं, तरी किमान आपल्याला खात्री नसेल त्या ठिकाणी गुंतवणूक न करणं, इतकं तरी प्रत्येक माणूस करू शकतो

सगळ्या उपलब्ध पर्यायांचा विचार करून त्यामधल्या शक्यता समजून घेऊन मगच गुंतवणूक करण्याची शिस्त गुंतवणूकदारानं स्वतःला लावून घेतली पाहिजे. यासाठी प्रचंड वाचन करणं गरजेचं असतं. तेवढा वेळ नसेल किंवा त्यासाठीची इच्छाशक्ती नसेल, तर मान्यताप्राप्त गुंतवणूकदार सल्लागाराकडूनही आपल्या दृष्टीनं पुरेशी असलेली माहिती नक्कीच मिळू शकते. आपल्या रोजच्या आयुष्यातही शक्य असेल तेव्हा वायफळ खर्च टाळण्याची शिस्तही बहुतेक जणांमध्ये नसते

अब्जाधीश झाल्यानंतरही वॉरन बफे आपल्या जुन्याच घरात राहतो आणि आपली जुनीच गाडी वापरत राहतो, हे उदाहरण पुरेसं बोलकं आहे. हाही आपलं नुकसान टाळण्याचा उत्तम मार्ग आहे, हे आपण विसरून जातो. 

गुंतवणुकीतून पैसे कमावण्याआधी ते न गमावणं किती गरजेचं आहे, हे मूलभूत सूत्र म्हणूनच प्रत्येक गुंतवणूकदाराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे.

जेव्हा शेअर बाजार वेगानं कोसळत असतो आणि सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं असतं, तेव्हा गुंतवणूकदारानं शेअर बाजारात ‘डिस्काऊंट’च्या मोठमोठ्या पाट्या लागलेल्या आहेत असं समजून चांगल्या शेअर्सची शक्य तितकी खरेदी करण्याचा सपाटा लावला पाहिजे. याउलट जेव्हा शेअर बाजारात आनंदाचं वातावरण पसरलेलं असेल तेव्हा तिथे ‘धोका’ अशी पाटी असल्याचं स्वतःला सांगून त्यानं सावधगिरी बाळगली पाहिजे.

मंत्र ३ : “इतर सगळे गुंतवणूकदार घाबरलेले (भित्रे) असताना ‘हावरट (लोभी) व्हा’ आणि इतरजण हावरट (लोभी) असताना ‘घाबरून जा (भित्रे).’”

गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदारानं फक्त स्वतःचा विचार न करता आपल्या आजूबाजूला- म्हणजेच शेअर बाजारात काय परिस्थिती आहे याचा अंदाज घ्यावा, असं बफे म्हणतो. म्हणूनच जेव्हा इतर सगळे गुंतवणूकदार घाबरलेले असतील तेव्हा आपण अक्षरशः हावरटासारखं वागलं पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. याचा सोपा अर्थ म्हणजे जेव्हा शेअर बाजारात निरुत्साहाचं वातावरण पसरलेलं असेल आणि विक्रीचा जोरदार मारा सुरू असेल, अशा वेळी आपण प्रचंड उत्साही असलं पाहिजे. अशा वेळी आपण शक्य तितकी खरेदी केली पाहिजे. इतर गुंतवणूकदारांचं म्हणणं बरोबर असेल, टीव्हीवर जे दाखवलं जातं ते आणि वर्तमानपत्रांमध्ये जी भाकितं केली जातात ती भाकितं हे सगळं खरं ठरेल आणि आपलं यातून प्रचंड नुकसान होईल अशी भीती गुंतवणूकदारांनी मनातून पूर्णपणे काढून टाकली पाहिजे. अत्यंत आक्रमकपणे खचलेल्या शेअर बाजारात खरेदी केली पाहिजे. 

याउलट जेव्हा अगदी पानवाला आणि शेअर बाजाराचा गंध नसलेला आपला एखादा मित्र-सहकारीसुद्धा शेअर बाजाराविषयी उत्साहानं बोलत असेल तेव्हा शेअर बाजाराची घसरण सुरू होण्याचा काळ जवळ आला आहे असं समजावं, असं अनेक जण म्हणतात. कुणालाच शेअर बाजार नक्की कधी वर जाईल किंवा खाली जाईल याविषयी ठाम अंदाज बांधणं शक्य नसतं; अगदी वॉरन बफेलासुद्धा. म्हणूनच या भानगडीतच पडू नये. 

उलट जेव्हा शेअर बाजारात बराच काळ अत्यानंदाचं याचा अर्थ, शेअर बाजारात इतर लोक हावरट बनलेले असताना आणि तेजीचं वातावरण असताना आपण आपली सगळी गुंतवणूक काढून घ्यावी का? अजिबात नाही. उलट वॉरन बफे तर शक्य असेल तर आपली गुंतवणूक ‘कायमस्वरूपी’ ठेवावी असं म्हणतो

प्रत्येकाला ते शक्य नाही. म्हणूनच शेअर बाजार खूप वर गेलेला असताना किमान नव्यानं गुंतवणूक न करणं किंवा ती कमी करणं आणि आधीच गुंतवणूक केलेली असेल आणि आपल्याला त्या गुंतवणुकीमधला थोडा हिस्सा खर्चांसाठी लागू शकतो असं वाटत असेल, तर तेवढ्या प्रमाणात ती काढून घेणं इतकंच गुंतवणूकदारानं करावं.

जर पैसे आणखी किमान पाच-सात वर्षं लागणार नसतील, तर मात्र शेअर बाजारामध्ये हाव पसरलेली असो वा भीती; गुंतवणूकदारानं त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावं, हे सगळ्यात चांगलं. 

हे ही वाचा : जाणून घेऊया भारतातील “म्युच्युअल फंडाचा” इतिहास

मंत्र ४ : “गुंतवणुकीमध्ये भन्नाट यश मिळवण्यासाठी भन्नाट गोष्टी करण्याची अजिबात गरज नसते.

वॉरन बफे म्हणूनच शेअर बाजारात भन्नाट यश मिळवण्यासाठी खूप भन्नाट गोष्टी करण्याची अजिबातच गरज नसल्याचं आग्रहानं सांगतो. याचा अर्थ, कुणालाही शेअर बाजारात सहजपणे वॉरन बपेसारखं यश मिळू शकतं, असा चुकूनही काढू नये. बफेच्या यशामागे एकलव्यासारखा एकाच लक्ष्याचा ध्यास घेण्याचा स्वभाव, कमालीची सोशिकता, विलक्षण बुद्धिमत्ता, रास्त जोखीम पत्करण्याचा स्वभाव, दीर्घ मुदतीचा विचार करून इतर सगळ्या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करण्याची तयारी, अशा अनेक गोष्टी आहेत. पण म्हणून गुंतवणुकीच्या विश्वात थोडंफार यश मिळवण्यासाठी बफेमध्ये असलेले सगळेच्या सगळे गुण आपण आत्मसात करायला हवेत, असं अजिबातच नाही. बपे इतकं यश प्राप्त करण्याची आशासुद्धा खरं म्हणजे कुणी बाळगू नये; कारण यातून निराशा पदरी पडण्याची शक्यताच दाट आहे.

सातत्यपूर्ण कामगिरी करणारे अनेक शेअर्स शेअर बाजारात उपलब्ध असतात. त्यांच्याविषयीची माहितीही उपलब्ध असते. असे काही निवडक ‘ब्ल्यूचिप’ शेअर्स कुणीही खरेदी केले आणि दीर्घ मुदतीसाठी आपल्याकडेच ठेवले, तर अगदी सर्वसामान्य गुंतवणूकदारसुद्धा कसलाच अभ्यास न करता शेअर बाजारात चांगलं यश मिळवू शकतो

विनाकारण किचकट आलेख, पीई रेशो, नेट प्रॉफिट, टार्गेट प्राईस, महागाईचा दर, व्याजदर, जीडीपी, चालू खात्यातली तूट, रुपया आणि डॉलर यांच्यातला दर, एनपीए अशा कुठल्याच गोष्टींचा विचार करण्याची त्याला गरज पडत नाही. 

शक्यतो शेअर बाजार खूपच वर गेलेला असताना अशी खरेदी टाळली, तर गुंतवणूकदाराचं नुकसान होण्याची शक्यता जवळपास मावळतेच

विशेषतः गुंतवणूकदार दहाएक वर्षं आपली गुंतवणूक टिकवून धरणार असेल, तर प्रश्नच मिटला. 

याउलट शेअर बाजारात यश मिळवायचं असेल, तर अशा सगळ्या संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे, असा गैरसमज अनेक जण मुद्दामच पसरवत असतात.

खरं म्हणजे शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंड योजनांमध्ये केलेली गुंतवणूक, ही अशी दररोज तपासण्यासाठी नसतेच. तिच्यात सातत्यानं चढ-उतार येतातच. या चढ-उताराची सवय गुंतवणूकदारानं करून घेतलीच पाहिजे

वॉरन बफे इथं आपल्याला नेमकं हेच सांगतो. शेअर बाजारात जो माणूस सातत्यानं खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो, त्या माणसाकडून हमखास चुका होतात. काही वेळा तो अचूकपणे ‘मार्केट टायमिंग’ साधतोही; पण यामुळे त्याचा आत्मविश्वास विनाकारणच वाढतो आणि तो सारखा ‘योग्य वेळ साधून’ खरेदी-विक्री करण्याच्या मागे लागतो. हे कुणालाच दीर्घ काळ जमणं शक्य नाही. साहजिकच अशा माणसाला लवकरच आपल्या या स्वभावामुळे मोठं नुकसान सोसावं लागतं. शेअर बाजारात जेव्हा एखाद्या माणसाचा फायदा होतो, तेव्हा दुसऱ्या कुणाचं तरी नुकसान होणं गरजेचं असतं; कारण प्रत्येक खरेदीमागे कुणाची तरी विक्री सुरू असते.

शेअर बाजाराकडे बघण्याचा बफेचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. आपल्याला हवं तेव्हा हवे ते शेअर्स हव्या त्या किमतीत अधूनमधून उपलब्ध करून देणारं ठिकाण यापलीकडे त्याच्या नजरेतून शेअर बाजाराला काहीच महत्त्व नाही.

मंत्र ५ : ‘एकदाच विचार करून गुंतवणुकीशी संबंधित असलेला निर्णय घ्या आणि तो निर्णय पुढची काही वर्षं तरी बदलू नका’

रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका. जेव्हा पैशांची गरज असेल, तेव्हाच या गुंतवणुकीमधले पैसे काढून घ्या आणि इतर वेळी शेअर बाजारातल्या घडामोडींमुळे आपल्या गुंतवणुकीच्या आकड्यांमध्ये काय बदल घडतो आहे याकडे ढुंकूनसुद्धा बघू नका, असं बफेचं म्हणणं आहे. 

ज्या कंपन्या अनेक वर्षांपासून सातत्यानं आपल्या मुख्य कौशल्याच्या किंवा वेगळेपणाच्या आधारे टिकून आहेत आणि नफा कमवत राहिलेल्या आहेत, अशा कंपन्यांचाच गुंतवणुकीसाठी विचार करण्याचा सल्ला तो देतो. अशा कंपन्यांचा व्यवसाय टिकाऊ असतो आणि त्या दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवणूकयोग्य असतात. सर्वसामान्यपणे रोजच्या वापरातल्या वस्तूंचा यात समावेश होतो. उदाहरणार्थ, लोक पटकन आपली टूथपेस्ट बदलत नाहीत किंवा आपल्या अंतर्वस्त्रांचा ब्रँड बदलत नाहीत. अशा क्षेत्रांमध्ये ज्या कंपन्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं असेल, त्या कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देतात.

एकूणच सातत्यानं बदल घडवणाऱ्या कंपन्या, आपल्या कामाचं स्वरूप बदलणाऱ्या कंपन्या, नवनव्या घडामोडींमुळे संकटात सापडू शकतील अशा कंपन्या, या सगळ्यांपासून दूर राहावं, असा बफेचा सल्ला आहे.

उलट ज्या कंपन्या आपल्याला वरवर कंटाळवाण्या वाटतात आणि वर्षानुवर्षं एकाच पद्धतीनं काम करत राहतात आणि तरीही नफा कमवत राहतात, अशाच कंपन्यांकडे गुंतवणूकदार वळले पाहिजेत,

कुठल्या कंपनीचा व्यवसाय किती झाला, तिला किती नफा/तोटा झाला, तिची प्रगती सुरू आहे का अधोगती, तिच्यावर किती कर्जं आहेत आणि इतरांकडून तिला किती रक्कम येणं आहे, ही सगळी माहिती आपल्याला कंपनीच्या आर्थिक विश्लेषणातून मिळते. हे आर्थिक विश्लेषण बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकौंट, वार्षिक अहवाल अशा अनेक गोष्टींच्या अभ्यासातून करणं शक्य होतं. म्हणूनच हिशेबांच्या डोलाऱ्यावर उभा असलेला अकौंटिंगचा विषय म्हणजेच उद्योगाची आणि व्यवसायाची भाषा आहे, असं वॉरन बफे म्हणतो. 

जर कुणाला शेअर बाजारात थेट गुंतवणूक करायची असेल आणि त्यात यश मिळवायचं असेल, तर अशा माणसानं अकौंटिंगमधल्या किमान मूलभूत संकल्पना तरी शिकून घेतल्याच पाहिजेत, असं बफेला वाटतं. अर्थातच, ज्या लोकांना हे शक्य नाही किंवा त्यांना त्यात रस वाटत नाही, त्यांनी सरळ म्युच्युअल फंड योजनांमध्ये पैसे गुंतवून मोकळं व्हावं, असं तो सुचवतो. 

आपल्या गुंतवणुकीविषयी खूप सजग आणि जागरूक असलेल्या गुंतवणूकदारांनी अकौंटिंगसारख्या विषयाची मुळं तरी अभ्यासलीच पाहिजेत. निदान कुठल्याही कंपनीची प्रसिद्ध होत असलेली आकडेवारी समजून घेणं, तिचा अर्थ लावणं आणि आकड्यांमधून दिसत नसलेल्या म्हणजेच लपून बसलेल्या बारीकसारीक गोष्टी हुडकून काढणं, हे प्रत्येक गुंतवणूकदाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. इतरांच्या सल्ल्यांनुसार शेअर्समध्ये गुंतवणूक करायची नसेल, तर त्यासंबंधीचा एकमेव पर्याय म्हणजे स्वतः कंपन्यांविषयी जाणून घेणं. कंपनी कशी आहे, ती विश्वासार्ह आहे का, तिचं व्यवस्थापन कसं आहे, हे सगळं आपल्याला समजू शकतं

गुंतवणूकदारांनी शेअर्स विकत घेताना आपण शेअर्स विकत घेत असल्याची भावना मनात आणता कामा नये, असं तो निक्षून सांगतो. जर गुंतवणूकदारांनी याऐवजी आपण संबंधित कंपनीच्या व्यवसायामधला काही हिस्सा विकत घेत आहोत अशी भावना आणली, तर आपला दृष्टिकोन पार बदलू शकतो. क्षणभर हा विचार मनात आणा. समजा आपण इन्फोसिस कंपनीचे पाच शेअर्स विकत घेतले आहेत, असा विचार करण्याऐवजी इन्फोसिस कंपनीच्या एकूण व्यवसायापैकी अगदी थोडा का होईना; पण हिस्सा विकत घेतला आहे असं मनात आणलं तर? अर्थातच यामुळे आपला आपल्या गुंतवणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन काही क्षणांसाठी तरी नक्कीच वेगळा होईल. आपण या शेअरची किंमत वर-खाली झाल्याबरोबर खरेदी-विक्रीचे निर्णय घेण्याऐवजी कंपनीचं भवितव्य कसं आहे, तिची कामगिरी कशी होत आहे, अशा गोष्टींचा विचार करायला लागू. कंपनीच्या भवितव्याचा विचार करून आणि तिच्या भरभराटीत आपलाही वाटा असेल असं समजून आपण ही गुंतवणूक जास्त डोळसपणानं करू.

आपण चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकदम उत्सुक असलो, तरी ही गुंतवणूक आपण शक्यतो विकत नाही, असं त्याला इथं म्हणायचं आहे. चांगल्या कंपन्यांना अधूनमधून वाईट दिवस येतातच; पण अशा अवघड परिस्थितीतून त्या कशा बाहेर येतात हे महत्त्वाचं असतं. ज्या कंपन्या खरंच दीर्घकालीन मुदतीसाठी टिकून राहतात आणि खराब काळातसुद्धा उत्तम कामगिरी करून दाखवू शकतात, अशा कंपन्यांचे शेअर्स विकायचे कशाला?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *